राष्ट्रऐक्य व्यासपीठ

पाण्याचा एक थेंब जोवर स्वतंत्र असतो, तोवर त्याची शक्ती त्या थेंबा पुरतीच असते. परंतू, जेंव्हा हा थेंब सागरास मिळून सागराचा भाग बनतो तेंव्हा त्याची शक्ती सागरा इतकीच अमर्यादित होते. राष्ट्रऐक्य व्यासपीठ हे एक औचित्य आहे सागर होण्याचे, अमर्याद होण्याचे, सागर होणे हा आपला अधिकारच नव्हे तर परमकर्तव्य आहे. हे विश्व निर्माण करणारी जर कांही शक्ति असेल तर तिने केवळ शिक्षा म्हणूनच आपल्याला पृथ्वीवर पाठविले असावे असा भास निर्माण होण्या सारखी परिस्थिती सर्वत्र दिसून येते. येथे हजारों वर्षापासून आहे जंगलाचा कायदा. जगायचे असेल तर जो जगायला समर्थ आहे तोच जगेल या एकमेव नियमावर चालणारा. म्हणून येथे जगायचे असेल तर बलवान होऊन जगावे लागेल. जंगलाकडून संस्कृतीकडे यावयाचे असेल तर अंधार, असंवेदनशीलता आणि असत्य यांचे कडून प्रकाश, जिवंतपणा आणि सत्य यांचेकडे जाण्याच्या हजारों वर्षापासूनच्या प्रयत्नातील आपला खारीचा वाटा उचललाच पाहिजे. बलवान झाले पाहिजे की पुढच्या पिढयांनी आपले आभारी रहावे, बलवान झाले पाहिजे की आपण आपल्या इतिहासातील केवळ सुवर्णपानांचीच पुनरावृत्ती करु, बलवान झाले पाहिजे की आपण आपला वर्तमान सुदृढ करु आणि ही वसुंधरा अधिकाधिक जीवनधारा बनवून जगण्यासाठी एक सुंदर ठिकाण करु. म्हणून सागर होणे हा आपला अधिकारच नव्हे तर कर्तव्यही आहे. या. जात, गोत्र, वर्ण, कुल, लिंग, वय, धर्म आणि पक्ष सुध्दा विसरुन या. बलवान बनण्याच्या, तमा कडून जोती कडे जाण्याच्या, मरणाकडून अमृतत्व प्राप्त करण्याच्या, असत्या कडून सत्याची म्हणजेच आपल्या अस्तित्वाची प्राप्ती करण्याच्या या अदिम संघर्षाचा हिस्सा व्हा. या आपण सारे सागर होऊ या. आणि ही पृथ्वी जगण्यास एक चांगले ठिकाण बनवू या. योग्य जागा बनवू या. सर्वानी मिळून. सर्वांसाठी.

अधिष्ठानाची आवश्यकता

राष्ट्रप्रेमिकांनो,
शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी या न्यायानेच कडू फळांच्या मूळाशी अशुध्द बीजे असतात. भ्रष्टाचाराच्या निर्मुलनाबाबत विचार करत असताना त्याच्या उगमस्थानांचा विचार करणे अगत्याचे आहे.

इंग्रज व्यापा-यांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी पंचाहत्तर प्रतिशत किल्ले पैसे चारुन जिंकले. त्यापूर्वी किंवा राष्ट्रआर्चक आचार्य चाणक्यांच्या काळात आंबी राजास अमिष दाखवून भारताची व्दारे सिंकदराने उघडी करुन घेतली. त्यापूर्वीही भारतात भ्रष्टाचार होता किंवा नव्हता हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराची ऐतिहासिक उगमस्थळे न पाहता आजच्या समाजव्यवस्थेत त्याची मुळे कशी रुजली आहेत हे पाहणे आवश्यक ठरेल.

तत्पूर्वी हे लक्षात घेणे गरजेचे आहे कीं, भ्रष्टाचारास कोणा एका व्यक्तीस उत्तरदायी ठरवणे किंवा एका समूदायास, जसे पुढा-यांना, दोषी समजणे चुकीचे आहे. हा दोष पूर्णत: समाज व्यवस्थेचा आहे. अशुध्द समाज मनाचा आहे. माझा जसा अनुभव आहे की, जे अनाहुतपणे भ्रष्टाचारात ओढले जातात, स्वत:ही करतात असेही भ्रष्टाचार निर्मूलनाबद्ल तिडकीनं बोलताना आढळतात. त्यामूळे व्यक्तिगत दोषारोप व्यर्थ आहे.

श्री. आण्णांच्या बाबत आदर ठेवून मला सांगायचे आहे. त्यांचा लढा बराचसा प्रतिकात्मक आहे. आणि आम्हांस गरज आहे ती प्रतिबंधक उपायांची.

मूलत: समाजमनाची अशुध्दता भ्रष्टाचारास जबाबदार आहे. जेंव्हा आपण एखादे आचरण भ्रष्ट आहे असे म्हणतो, तेंव्हा आचरण सुधारणे आवश्यक आहे हे सहज स्पष्ट आहे. जे लोक धर्म आणि राजकारण यांची फारकत करु इच्छितात त्यांना माझे नम्र आवाहन आहे कीं, शाळा, कॉलेजातून धार्मिक, नितिमत्तेचे शिक्षण आवश्यक आहे. याने त्याने आपापला धर्म आचरावा. आणि मी आपणांस खात्रीपूर्वक सांगू इच्छितो कीं, जेंव्हा एक हिंदू ख-या अर्थाने हिंदू होईल, जेव्हा एक मुसलमान ख-या अर्थाने इस्लामचा अवलंब करेल, जेंव्हा ख्रिस्ती खर्या अर्थाने ख्रिस्ती जीवन मूल्यांचा अवलंब करेल तेव्हां नितिमूल्यांसाठी आक्रोश करावा लागणार नाही. समाजाच्या नसेनसेतला भ्रष्टाचारच नव्हे तर सारेच पाप धुऊन निघेल. आणि जागतिक राजकारणाच्या इतिहासातील सर्वात नितिमान रायाचा उदय होईल.

हा झाला मूलभुत विचार पण भ्रष्टाचारास अनेक अनुषंगिक कारणेही आहेत. त्या सार्यांचा येथे विचार करणे आवश्यक असले तरी शक्य नाही. म्हणून प्रमुख कारणे आणि त्यावरील उपायांची मिमांसा आपण करु.

मॅझीनी म्हणतो कीं, मूर्ख, अज्ञानी लोकांच्या हाती लोकशाही म्हणजे प्यालेल्या माकडाच्या हाती कोलीत. अर्थात जोवर लोकशाही म्हणजे काय? त्यामूळे आपणांस कोणते अधिकार व कर्तव्ये प्राप्त होतात? याबाबतीतच लोक अज्ञानी असतील तर त्यांना त्यांच्यावर होणारा अन्याय तो कसा कळणार? आणि त्याची दाद तरी ते कशी काय मागणार?

इतर अस्तित्वात असलेले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कायदे नव्हे तर स्वत: भारतीय राय घटनेबद्ल सुध्दा लोकांत प्रचंड अज्ञान आहे. आणि याचाच अधिकारी आपल्या स्वार्थासाठी वापर करतात. यासाठी लोकशिक्षण अगत्याचे आहे. लोकांना अक्षरज्ञाना बरोबरच अशा कायदयांचे ज्ञान झाले पाहिजे यांचा प्रत्यक्ष परिणाम त्यांच्या दिनचर्येवर होत असतो. भारतीय रायघटना जगातील एक उत्कृष्ट रायघटना आहे. तो भारताचा धर्मग्र्रंथ आहे. त्याची जागोजागी पारायणे झाली पाहिजेत. म्हणजे घटनेची जी उद्ष्टिे घटनाकारांनी पन्नास वर्षापूर्वी सांगितली ती साध्य होण्यासही मदत होईल. भ्रष्टाचारास आळा बसेलच.

कायदा हा लोक कल्याणसाठी कसा? असा प्रश्न जवळपास प्रत्येक विधेयक वाचताना कमी जास्त तिव्रतेने पडतो. क्लिष्टता, अव्यवहार्यता हे तर काही कायदयांचे स्वभावच आहेत. त्यातील पळवाटांचाच नव्हे तर तथाकथित कल्याणकारी तरतूदींचाही फायदा भ्रष्टाचारी करुन घेतात. जसे, मुंबई मुद्रांंक कायदा, 1958 मध्ये या मुद्रांक खरेदीदारास कांही कारणास्तव मुद्रांक नको आहे. त्यास तो परत करणेसाठी असलेल्या प्रक्रिये बद्दलच्या तरतूदी आहेत. त्याच बरोबर या मुद्रांक विकत घ्यावया बाबतच्या तरतूदी असायला हव्यात त्याबाबत म्हणजे – कोठून कसा विकत घ्यावा याबाबत उणीपूरी एक ओळही नाही. पण मुद्रांक परतीच्या प्रकियेबाबत मात्र आख्खे प्रकरण आहे. (Allowances for stamps in certain cases) कलम 47 ते कलम 52(अ). याचा अर्थ जे प्रामाणिकपणे सरकारी कर भरतात तो भरल्यावर आपण हा कर भरण्यास पात्र नाही हे त्यांना समजले आणि तो कर ते परत मागतात तेंव्हा खुद् कायदेतज्ञ अशा परतीस सवलत (Allowance) म्हणून त्यांचा अपमान करतात. इतकेच नव्हे तर ते अधिका-यांना अधिकार देतात कीं, करा या लोकांची चौकशी. का घेतला? कशासाठी घेतला? मुद्रांक का परत करताय? प्रतिज्ञापत्र करुन घ्या. दाखले आणायला लावा. लावा कागदपत्र, झेरॉक्स प्रति आणायला. बरे मग ते बिचारे धावपळ करतात. सर्व बाबींची पूर्तता करतात मग कायदा काय सांगतो? तर म्हणे आता आपल्याला हे लोक सवलतीस पात्र आहेत कि नाहीत हे ठरवायला हरकत नाही. हे हक्कही या अधिका-यानांच असतात. आणि हा कागद अंतिम अधिका-याजवळ जाण्या आधी अनेक अधिका-यांच्या टेबलावरुन की खालून गेलेला असतो, हे लक्षात घ्यावे. बरे. सवलतीस पात्र आहे कि नाही हे ठरवायला काय मार्गदर्शक तत्वे आहेत हे कायदेतज्ञानांही माहित नसावे? तेथे आम्हां सामान्यांची काय कथा? बरे. इतकेच नव्हे तर जर का ही व्यक्ती सवलतीस पात्र नसेल तर ती दंडास आणि शिक्षेसही पात्र ठरवण्याचे अधिकार या कायदयाने दिले आहेत. अश्या त-हेने हे कल्याणकारी कायदे लोकांना अधिका-यांच्या दयेवर अवलंबून ठेवतात आणि मग आपले काम करुन घेण्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात.

यांनी कायदे बनवले त्यांनी याचा विचार केला असेलच. पण हा दोष काही या एकाच कायदयात नाही. तर सराारला या या कायदयांनी महसूल गोळा करण्याचे अधिकार दिले आहेत. त्या सर्वच्या सर्व कायदयात आहे. जो कर जमा होणार तो कल्याणकारी रायाच्या निर्मितीसाठी खर्च होणार हे खरे. पण तो कसा जमा होणार व तो जमा करणार्यांना अधिकार कसे प्रदान करावेत जे लोकांना कल्याणप्रद होतील याचा विचार व्हायला हवा.

कायदयातील क्लिष्टता, अधिका-याचे अधिकार, भरमसाट कागदपत्रे हे सर्व कमी केले पाहिजे. एक सर्वसाधारण नियम आहे. बळी तो कान पिळी. अधिकार मिळाल्याने आणि इतरांहून त्या अधिकारांचे जास्त ज्ञान असल्याने जे बळजोर झाले आहेत. ते त्याचा अनिष्ट वापर करणार हाच तो सर्वसाधारण नियम. नाही तर सरकारी नोकरांना लोकांनी ‘नोकरशहा अशी उपाधि दिलीच नसती.

नोकरशहा या विषयावर असेच लिहीत राहिले तर एक ग्रंथ तयार होईल. तरीही महसूल विभागा विषयी थोडेसे ‘जो तळे राखिल तो पाणी चाखील या तत्वप्रणालीला कायदेशीर मान्यता जरी नसली तरी ती व्यवहारात फार मोठया प्रमाणात मान्य आहे हे उघड गुपित आहे. पण आजकाल होत असलेले घोटाळे पाहता ताळतंत्र सुटल्याचे दिसते. चाखणे पर्यत ठिक आहे असे मानू. पण ही पिंेप आणि हौद भरुन पाणी साठवून ठेवायची आणि रिकामं झालेले तळ राखल्याचं नाटक करायची पध्दत घातकी आहे. जे विश्वस्त आहेत त्यांच्या विश्वासाला मारक आहे. तरी झालेली जनजागृती सुखावह आणि मॅझीनीचं वाक्य बरचस खरं करणारी आहे.

लोकप्रतिनिधींबद्ल काय बोलावे? डॉ. आंबेडकरांनी घटने संदर्भात भाष्य करतांना एकदा सांगितले होते कींं, ही घटना जशीच्या तशी अंमलात आणण्यासाठी आणि कल्याणकारी रायाच्या संस्थापणेसाठी एकच धोका संभवतो. आणि तो म्हणजे सत्ताधारी आणि अधिकारी यांचे संगनमत. आणि हीच आजच्या भ्रष्टाचाराची शोकांतिका आहे. बरे. निवडणूक खर्चावर निर्बंध घालून श्री.शेषन यांनी चांगला उपक्रम केला आहे. तरीही या आश्वासनांची पूर्ती निवडून आल्यावर केली जाणार आहे त्यांना कसली आचारसंहिता लावणार. येथे तर आमची भ्रष्ट साखळीच आहे. कनिष्ठास वरिष्ठ अधिका-याला आणि त्यास सत्ताधा-यांना पैसे देणे कायदयातील तरतूदींमुळे भाग पडते. त्याला तसे करावे लागते. कारण, त्याला त्याची नोकरी गमवायची नसते. बदल्यांचा खेळ तर जग जाहिर आहे. आणि जी लाच तो आपल्या पगारातून देऊ शकत नाही. ती लोकांचे खिसे रिकामे करुन दिली जाते. सुरुवात अशी होते. मग स्वत:ची घरे भरली जातात. राजा बोले दल हाले. जेथे उच्च नैतिक मुल्ये असलेले देशाभिमांनी नेतृत्व नाही. जेथे राजकारणासाठी राजकारण न होता त्याकडे व्यावसायिक दृष्टीने पहिले जाते. राजकारणात समाजकरणाचा लवलेशही नाही. त्या देशात दुसरे ते काय होणार? यासाठी गरज आहे ती योग्य नेत्यांची. बरे. भ्रष्टाचार सार्वत्रिक आहे. एका राष्ट्रीय नेतत्वाच्या उदयामुळे. तो पूर्ण आटोक्यात येणे शक्य नाही. तो जेथे सुरु आहे तेथे तेथे तो रोखला पाहिजे. त्यासाठी स्थानिक नि:स्वार्थी, सत्वशिल नेतृत्वाची गरज आहे. जी पूर्ण करण्याची शक्ति फक्त शिक्षणात आहे.

आज आपल्या हाती तीन गोष्टी आहेत.

एक म्हणजे जेथे जेथे भ्रष्टाचार होत असेल त्या सर्व पातळयांवर त्याचा संघटित विरोध. त्यासाठी स्थानिक पातळीवर एका नव्हे अनेक आण्णा हजारेंची गरज आहे. राष्ट्रव्यापी जागृतीची गरज आहे. संघटित प्रयत्नांचे सारे नियम त्यावेळी पाळले गेले पाहिजेत. नाही तर सुरुवातीला जोरदार आंदोलन करुन नंतर आपला ऊस जातोय म्हंटल्यावर जे शेतकरी लगेच शिवारात तोडणीला पळाले. आणि जे पुढच्या वर्षी परत ऊस दरासाठी होणा-या संपाला जबाबदार आहेत. त्यांच्या स्वार्थी आंदोलनासारखी याची गत होईल.

दुसरे म्हणजे नैतिक, धार्मिक, राजकीय अधिष्ठान. शिक्षणाच्या वेगवेगळया माध्यमातून मग ते शाळा असो, महाविदयालय वा लोककलेचे कोणतेही साधन, राष्ट्रीय भावना वाढविली पाहिजे. लोकांना त्यांच्या अधिकारांबरोबर त्यांच्या कर्तव्यांचीही जाणीव करुन दिली पाहिजे. जे लोक राष्ट्र कर्तव्यांचा विषय काढल्यावर, ‘राष्ट्रांने आम्हांस काय दिले? असे विचारतात. त्यांना मी सांगू इच्छितो कीं ‘हा निर्लज प्रश्न विचारण्याची संधी आणि ताकद या राष्ट्रानंच आपल्यांला दिली आहे. आणि आपल्या प्राचीन पूर्वजांनी ठेवलेले ठेवे पहा. मित्रांनो ते वाटण्यासाठी. आधी तुम्हीं ते वेचायला जाल. पण ते नुसते वेचायचे म्हटले तरी कित्येक आयुष्ये अपुरी पडतील.

तिसरी गोष्ट म्हणजे वाट पहाणे. पहाटेची. सुर्योदयाची. समृद्ध, सुफल, सुजग, धर्मनिष्ठ, नितीनिष्ठ भारताची. जिथला प्रत्येक बाहु राष्ट्राच्या हितासाठी उठेल. राष्ट्रगुंजने प्रत्येकाच्या हृदयात उठतील. जेथे व्यक्ति, समूह यांच्या हितापेक्षा व्यापक राष्ट्रहिताचे अनुनय केले जाईल. राष्ट्रभक्तांनों, आपण प्रत्येक जण म्हणतो की हे सारे कुणी तरी थांबविले पाहिजे. हे कुठे तरी थांबले पाहिजे. किती सोपे आहे. याचे प्रश्न स्वरुप उत्तर. ते कुणी तरी आपणच का असू नये? हे सारे जिथे थांबणार तो काळ आपणच का ठरवू नये?

वंदे मातरम.

अश्विन शुद्ध 10 श्रवण विजया दशमी
दिनांक 06/10/2011

रणजितसिंह घाटगे
राष्ट्रऐक्य व्यासपीठ